Thursday, August 27, 2020

यंदाचा गणेशोत्सव

                                                यंदाचा गणेशोत्सव 


यावर्षी बाप्पाचे आगमन शांततेत झाले व काल गणेशभक्तांनी दिड दिवसाच्या बाप्पाला शांततेत व सुरक्षिततेत भावपूर्ण निरोप दिला.गणेशभक्तांना गणपतीबाप्पाला कसे आणायचे? असा प्रश्न पडला होता.यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.बाप्पा कधी आले आणि गेले ते कळलेच नाही. यंदा मात्र मनाला रुखरुख लागून गेली. दरवर्षी प्रमाणे बाप्पाचा आदरातिथ्य करता आले नाही. दरवर्षीप्रमाणे मिरवणुका,सजावट, आरत्या व जाणरणं झालेच  नाहीत.गणेशोत्सवाच्या तयारीला खूप दिवसापासून सुरुवात व्हायची.सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडप उभे राहून डोकेरेशन सुरु व्हायचे.कोकणात जाणा-यां चाकरमान्यांची तिकीटं बुक व्हायची.खरेदीची धावपळ सुरु असायची.  


यंदा बाप्पाच्या मुर्तीची ऑनलाईन बुकिंग झाली. गणपतीचे आगमन ढोलताश्याच्या मिरवणुकीने झाले नाही.तर ठरलेल्या वेळी बाप्पाची मुर्ती घरपोच झाली.सजावट घरातल्या वस्तूनेच केली.कागदी फुलं,वीजेची तोरण अशी साजेशी सजावट करण्यात आली.रात्री रात्री जागवून डेकोरेशन झाले नाही.वर्गणी जमा केली नाही.   

 

गुरुजीने ऑनलाईन पुजा सांगत प्राणप्रतिष्ठा केली. काही गुरुजीने तोंडाला मास्क लावून पुजा सांगितली.पुजेचे साहित्य,फुलं,फळं मिळाले तसे अपर्ण केले.पाहुणे मंडळी आली नाहीत.सुनेसुने वाटले.फक्त घरातल्याच मंडळीने पुजेत भाग घेतला.घरातल्या महिलांनी मात्र बाप्पाला नारज केले नाही. बाप्पाला आवडतात त्या उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला.यावर्षी मावा व खव्याचे मोदक बाप्पाला मिळाले नाही. काही नातेवाईकांनी कुरियरने प्रसाद पाठवला होता.

फक्त आपल्या घरातच ठरविक आरत्या शांततेत झाल्या.दुस-यांकडे आरतीसाठी जाता आले नाही.ब-याच नातेवाईक व मित्रमंडळींनी ऑनलाईन दर्शन घेतले व आरत्या केल्या.महिलांना नटायला व सजायला मिळाले नाही.बाप्पाच्या दर्शनाला कोणीच आले नाही.

ढोलताशा व फटाल्यांच्या जल्लोषात होणारे बाप्पाचे विसर्जन यावर्षी सुरक्षितता राखत कृत्रीम तलावात तर काहींनी घरातच बालदीतच केले. गणेशोत्सवाला यंदा मजा आली नाही.पुढच्या वर्षी मोठ्या आनंदात सण साजरा करु असे सांगत बाप्पाला निरोप देताना गणेशभक्तांच्या डोळ्यात पाणी आले. ’काही चुकले असेल तर क्षमा कर’ हे सांगायल्या दोन्ही कर जुळले होते.    

नेहमी आनंदात साजरा होणारा बाप्पाचा सण गणेशभक्तांना सुरक्षा पाळत शांततेत साजरा करावा लागला.गणेशोत्सव सोहळा मनासारखा साजरा करता न आल्याने गणेशभक्त नाराज दिसले. गणेशोतसवाच्या इतिहासात यावर्षीच्या आगळ्यावेगळ्या  गणेशोत्सवाची नोंद होईल. 

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीतल्या वारक-यांनी साधेपणा दाखवला तसाच साधेपणा गणेशोत्सवात गणेशभक्तांनी दाखवला.अशा   बदलाचे स्वागत व्हायला पाहिजे.   

यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करीत जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करुन दाखवला.

No comments: