Saturday, December 25, 2010

अनाथांची माय

         अनाथांची माय  म्हणून लौकिक असणा-या,आपल्या अलौकिक कर्तृत्वाने आईच्या नात्याचा कळसाध्याय रचणा-या, अनाथांच्या उध्दाराचे काम करणा-या व निराधारांची "माई" सिंधुताई सपकाळ.

एक मूल सांभाळताना स्त्रीची दमछाक होते. त्यातच 3-4 मुलांचा सांभाळ करायचा म्हटला तरी त्या स्त्रीला जीव नकोसा होतो. असं असताना एक वा दोन नव्हे तर हजारो लेकरांची माय होऊन त्यांचं संगोपन करताना सिंधुताई सपकाळ यांना किती कष्ट पडत असतील? याची केवळ कल्पनाच केलेली बरी. समाजाने धुत्कारलेल्या असंख्य बालकांना आपलं म्हणून आयुष्यभर त्यांचा सांभाळ करणार्‍या याच सिंधुताई सपकाळ.



एक समाजसेवी महिला म्हणजे सिंधुताई सपकाळ.हे नाव उच्चारलं की जिद्द म्हणजे काय ते कळतं.हे नाव उच्चारलं की अंधारलेल्या मनात विश्वासाची भावना निर्माण होते.डबडबलेल्या डोळ्यांमध्ये आशेचा दिप निर्माण होतो.अनेक अनाथाना हक्काचे घर आणि मायेचं माहेर देणा-या सिंधुताईचे उभं आयुष्य म्हणजे एक जबरदस्त नाट्य असलेली पटकथाच आहे.

"सायकलची दोन चाके म्हणजेच महिला आणि पुरुषत्यातही मागील व महत्त्वाचे असे चाक म्हणजे ज्यावर सायकलची सीट असते. साखळीबरोबरच पायडल व सामानासाठी कॅरियर आणि सायकल उभी राहावी म्हणून असलेला स्टँड या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींचा भार असलेले मागील चाक म्हणजेच ‘माय’ असून तिला विसरून चालणार नाही. माय नाही तर काही नाही, "अशा शब्दात महिलांचे महत्त्व सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केलेले आहे.

माई,वयवर्षे ६५,पहिल्या पासून काही तरी करण्याची जिद्द.लग्न नंतर हि त्यांनी गावातल्या महिलां साठी त्यांच्या हक्का साठी लढा दिला.पण त्याचा मोबदला म्हणजे त्यांना त्यांच्या नव-याने व सासर कड्यांनी घरा बाहेर काढले लहान मुली सोबत होती.पण २१ वर्षच्या माईनी धीर सोडला नाही.पूर्वी चे दिवस फार कठीण गेले.पुण्याच्या रेल्वे स्थानकावर भिक मागून गेले.पण जे काही मिळायचे ते पण स्वतःकडे न राखून बाकीचे जे भिकारी आहेत त्यांना वाटायचे.खास करून लहान मुलांना.मला जेव्हा घर बाहेर काढले तेव्हा जगण्या साठी मी भिक मागायचे, पण आज पण मी कटोरा घेऊन सगळी भिक मागत असते, फरक फक्त एवढाच आहे कि,पूर्वी स्वतः साठी भिक मागायचे आणि आता माझी मुलांसाठी".

'वयाच्या २०व्या वर्षी मी आणि माझी मुलगी गावोगावी फिरत असताना मला भिकारी मदत करायचे. मला मिळालेले जेवण मी सर्व भिकाऱ्यांसोबत वाटून खायचे. मी जेवण दिल्यावर सर्व भिकारी माझ्या संरक्षणासाठी माझ्या शेजारी कडे करून झोपायचे. त्यांच्यातली ही माणुसकी शिकण्यासारखी होती',असे सिंधुताईं मुलाखतीत सांगतात.

"मी माझ्या पतीचे खूप आभार मानते कि जर त्यांनी मला घर बाहेर नाही काढले असते तर आज मी या ठिकाणी येऊन पोहोचली नसती.ते सुद्धा माझ्या आश्रमात राहतात.खूप थकले आहेत आता.त्यांना बघणारे कोण नव्हते म्हणून मीच त्यांना इथे आणले.पण त्यांना आणताना मी स्पष्ट सांगितले कि इकडे यायचे असेल तर माझा मुलगा म्हणून या. पती म्हणून नव्हे." अर्ध्याहून जास्त आयुष्य अनाथ मुलां साठी घालवले त्याच माईचे बोल.

शिवाजी महाराज,महात्मा फुले यांचे पुतळे सर्वत्र दिसतात.परंतु शिवाजी महाराजांना घडविणा-या जिजाऊमाता,महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या सावित्रीबाई फुले यांचे पुतळे फारसे दिसत नसल्याबद्दल सिंधुताईनी खंत व्यक्त केली आहे. तसेच    'माझ्या कार्याची दखल घेणारा लेख कर्नाटकच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्राने अद्याप त्याची दखलही घेतली गेली नाही', स्त्रीच्या कर्तृत्वाची दखल कधी घेतली जात नाही , अशीही खंतही त्यांनी व्यक्त केली.

'वेदनेच्या शोधात निघाल्यावर मला लोकांच्या वेदनेची जाणीव झाली.तुमच्यावर अनेक संकट कोसळतील पण त्यातून मार्ग काढायला शिका.स्वत:साठी नव्हे तर दुस-यांसाठी जगा. तुमच्यावर जुलूम करणा-याना मोठ्या मनाने माफ करायला शिका',असा सल्लाही सिंधुताईं देतात.

एकवेळी प्रेताच्या सरपणावर भाकरी भाजल्या आणि आता लोक मला जेवणाचा आग्रह करतात, हे त्यांच्याकडून ऐकतांच्या भावनांचे बांध फुटतात. पण सावरण्यासाठी त्याना जळगावानेच हात दिल्याने त्या जळगावला माहेर मानतात. त्यांचे अनुभव ऐकताना अनेकांना आपले अश्रु आवरणे कठीण जाते.

थंडी वाजत असताना चितेची शेक घेणा-या आणि गरिबीमुळे पिंडाचा भात खाणा-या या शेकडो लेकरांच्या मायमाऊलीचा हा आयुष्यप्रवास 'मी सिंधुताई सपकाळ' या नावाने बनलेल्या मराठी चित्रपटात उलगडला आहे. चित्रपटाची सुरुवात होते ती सिंधुताई सपकाळ यांच्या अमेरिका दौ-‍याने. मराठी साहित्य परिषदेच्या निमंत्रणावरुन त्या प्रथमच विमान प्रवास करुन अमेरिकेत जात असतात. तेथे त्यांचे खास भाषण आयोजित केलेले असते. या विमान प्रवासात त्यांच्या बालपणीच्या आठवणी विमानात घडलेल्या प्रत्येक छोट्या प्रसंगाबरोबर ताज्या होतात. ज्याचे दर्शन प्रेक्षकांना फ्लॅशबॅकद्वारे होते.जेव्हा सिंधुताई अमेरिकेत भाषण करतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही अविस्मरणीय घटनांची आठवण करुन देतात ज्यामुळे प्रेक्षकांना जीवन जगण्याची व एका स्त्रीने दिलेल्या लढ्याची खरी कल्पना येते.

'मी सिंधुताई सपकाळ'या मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवली आहे.जगातील अनेक नामवंत चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.सिंधुताईंच्या जीवनावर चित्रपट काढल्याने त्यांच्या कार्याची दखल  जगाने घेतली आहे.


 

आपल्या काळजातील " आई जपून ठेवा ",असे त्यांचे तळमळीचे सांगणे आहे.




1 comment:

Anonymous said...

ATISHAY SUNDAR MAHITI ME MAZYA MUL ANLA VACHUN DAKHAWALI

HI PRATIKRIYA THYANCHYKADUN