Friday, June 26, 2020

कधी होणार यातून सुटका?

                                          कधी होणार यातून सुटका?


करोनाचा संसर्ग वाढू नये.याकरीता तीन महिने घरात बंदिस्त राहून सगळेजण कंटाळले आहेत. विषाणुचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे.अनलॉकमुळे जरुरीचे व्यवहार सुरु झाले आहेत.पण गरजेचे असेल तेव्हाच माणसं घरातून बाहेर पडत आहेत. ’एप्रिल’ नंतर ’मे’ नंतर ’जून’ पासून या विषाणूचा जोर कमी होईल असे भाकित केले गेले.या आशेवर लोकांनी वाट पाहिली पण विषाणूचा कमी होण्याचा विचार नसून त्याचा संसर्ग वाढत आहे.टाळेबंदी उठली तरी या चिंतेच्या चक्रातून सुटका झाली नाही.     

जगाला लागलेले हे ग्रहण कधी सुटणार? संकट कधी दूर होणार? या समस्यातून कधी सुटका होणार? असे सर्वांना वाटत आहे. काय करायचं काहीच सुचत नाही. अद्याप यावर कोणतेही औषध अथवा लस उपलबद्ध नसल्याने यातून आपली सुटका कशी व कधी होणार? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे.पण सध्याची घडी मात्र अशीच न राहता ती कधी एकदा बदलेल याची सर्व जण आतुरेतनं वाट पाहात आहेत.

पूर्वीचे आपले दिवस सारखे डोळ्यासमोर येत आहे.तसा आंनद घेता येत नाही. कायम भितीच्या सावटाखाली वावरावे लागत आहे.कोणाकडे जाता येत नाही तर कोणाला घरी बोलावता येत नाही.अशी विचित्र पंचाईत झाली आहे.सगळे सण घरातच साजरे केले. सगळे कार्यक्रम रद्द झाल्याने कोणाचीही भेट होत नाही.ऑनलाईन भेटण्यास आता मजा राहीली नाही.घरातील सर्व लहानथोर मंडळी घराबाहेर पडण्याचा आग्रह धरीत आहेत.कोणावरतरी संतापून आपला सगळा राग काढण्याचा प्रकार होत आहे. दैनंदिन व्यवहार हळूहळू सुरू होतील,पण त्यांची घडी बदललेली असेल. आपले काही व्यवहार सुरळीत होतील, तर काही होणार नाहीत. काही थोडय़ा, तर काही दीर्घ काळाने सुरळीत होतील असे वाटते आहे. 


काही बातम्या नक्किच दिलासादायक ठरल्या आहेत.कोरोनाने आपल्याला काही धडा दिला असेल तर तो म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याचा दिला आहे.कोरोनाने जे संकट उभे केले आहे ना, ते लक्षात घेता भविष्यात अशी जी काही संकटं येतील, त्यांचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करणे ही काळाची गरज आहे.आपल्याकडे आयुषमान भारतामध्ये योजना लागू आहे. ती अधिक परिणामकारक रीतीने राबविण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणात असावी, जेणेकरून तिची अंमलबजावणी करताना योग्य तो समन्वय राखला जाईल. सध्या आपल्या देशात प्रत्येक राज्याची वेगळी आरोग्य यंत्रणा आहे. त्यामुळे केंद्र व राज्य यात समन्वय राखणे कठीण होत आहे आणि त्याचा फटका कारण नसताना गरजू रुग्णांना बसतो आहे. केंद्र सरकारने आयुषमान भारत योजनेअंतर्गत ही यंत्रणा देशव्यापी आपल्या हाती ठेवली, प्रत्येक नागरिकाचा आरोग्य विमा काढला आणि आरोग्य सुविधा पुरविल्या तर कोणत्याही नागरिकाची अडचण होणार नाही. यामुळे समाजातील असुरक्षिततेची भावना नाहीशी होईल, आरोग्याच्या बाबतीत भीतिमुक्त समाज उभा होईल.

कुठलाही काळ, मग तो अनुकूल असो वा प्रतिकूल, कायमस्वरूपी तसाच राहात नाही. तो बदलत असतो. पुढे अधिक चांगलं घडेल, हा आशावाद मनुष्याला जगण्याची उमेद देत असतो. सध्याच्या अवघड काळातही उमेद वाढू शकेल अशा अनेक घटना आजूबाजूला घडत असतात. त्यांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं, तर आशावाद जागता ठेवता येईल.

आपल्याला सुरक्षित ठेवून सुटका कधी होणार याची प्रतीक्षा करणे हा एकच मार्ग राहीला आहे. 

No comments: