Sunday, July 5, 2020

मस्त पाऊस बरसला.
                                                           मस्त पाऊस बरसला.

ब-याच दिवसांनी वेगळाच वीकेंड  गेला. दोन दिवस पावसाने धुवाधार बॅटिंग केली.मस्त कोसळत होता. हवेत गारवा आला.एकदम सगळीकडे शांतता पसरली आहे.पाऊस आपल्याच सुरात मस्त गात होता. थोडा पाऊस पडला की मुंबईकराला घरी कसे पोहचणार याची काळजी असते.काही जण घरून कामे करत आहेत. तर काही घरातच आहेत.ठराविक कार्यालय सुरु आहेत.शाळा व कॉलेज बंद असल्याने बच्चे कंपनी व तरुणाई घरीच आहेत.कालचा पाऊस सर्वांनी घरातूनच कुंटुबासोबत अनुभवला. आपल्याला हवाहवासा व आपलासा वाटणारा पाऊस सुरु झाला आहे.रिमझिम पाऊस व त्याचे खिडकीवर उडालेले थेंब जेव्हा काचेवरून घरंगळत खाली येतात ते पाहण्यासारखे असते.रिमझिम पावसाने आपली हजेरी लावली आणि मन प्रसन्न झाले.खूप दिवसांनी असा मस्त पाऊस पडताना आज इतकं निवांत बघता येत होतं.     
 
घामाच्या धारांनी त्रस्त झालेले आपण कधी आकाशात काळे ढग जमतात आणि कधी पावसाच्या सरी बरसतात याची आतुरतेने वाट पाहत असतो. मग एकदा का पाऊस कोसळायला सुरुवात झाली की, मातीचा सुगंध आणि हवेतील गारवा आपल्या मनाला आनंद देऊन जातो आणि सुरुवात होते ती खमंग पदार्थांची. पाऊस आणि वाफाळता चहा, गरमागरम भजी हे समीकरण पिढ्यानपिढ्या रुजलंय. लोकांनी गरम गरम कांदा भजी व वाफाळलेल्या चहाची लजत लुटली.मस्त भिजणारी प्रेमजोडी… एका छत्रीतून जाणारी ती दोघं… साचलेलं पाणी… त्यात सोडलेल्या कागदाच्या होडय़ा… आणि… मस्त भाजलेलं मक्याचं कणीस… गरमागरम कांदा भजी… तिखटसर मसाला चहा...गाडीने अंगावर उडवलेले पावसाचे पाणी... आणि अक्षरशः बरच काही.....

पाऊस पडला की कोणी बाईक काढून मस्त भिजत लाँग ड्राईव्हला जातं, तर कोणी प्रेयसीसोबत समुद्रकिनारी जाऊन दगडांच्या आडोशाला हा पाऊस अनुभवत असतं. काहीजण हा पाऊस फक्त घराच्या खिडकीतून अनुभवतात, तर काही लांब डोंगरावर जाऊन.तर वयस्कर जुन्या आठवणी काढतात. लहान मुल तर पावसात भिजून वेडी होतात. प्रत्येकाची पाऊस अनुभवण्याची वेगळी त-हा असते. पाऊस म्हटलं की ओले चिंब होण्याचा आनंद. मनाला ताजेतवाने करणारी थंड हवा आणि हिरवागार निसर्ग बघून मन प्रसन्न होते. पावसात भिजण्याची मज्जाच काही वेगळी आहे.

मुंबईत काही ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याच्या बातम्या होत्या.अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली. शहरात पडलेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. त्या नेहमीच्या झाल्याने त्या महत्वाच्या नव्हत्या.रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती. त्याचबरोबर काही ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडून नुकसानही झाले.दोन्ही रेल्वेसेवा सुरु होत्या.   

पावसाचा आनंद शेतकऱ्यांना होतो.पेरणी होऊन लावण्या सुरु झाल्या आहेत.अशावेळी पावसाची गरज असते.त्याच वेळी पाऊसाने हजेरी लावण्याने शेतकरी सुखावला आहे.पावसाचा आनंद मातीशी संबंध असणाऱ्या लोकांनाच जास्त होतो. 


पावसामध्ये मुक्त भिजण्याचा आनंद न घेता आल्याने तरुणाई नाराज दिसली.. 

No comments: