Sunday, July 12, 2020

एक दिवस



एक दिवस

गाड्यांच्या हॉर्नने जाग आली.घरात किचनमध्ये गडबड सुरु होती.ऑफिसला जायला उशिरा होऊ नये म्हणून लवकरच तयारीला लागलो. चहा पित असताना पेपर वाचला. दोन दिवस पाऊस पडणार नसल्याचे भाकीत होते. माझी तयारी झाल्यावर सगळ्या गोष्टी घेऊन  बाहेर पडलो.सोसाय़टीतल्या वॉचमेनला सुचना दिल्या व निघालो. बाहेर रस्त्यावर रिक्षासाठी  व बससाठीही मोठ्या रांगा लागल्या होत्या.एवढी गर्दी कोठून आली.ऑफिसला जाणारे,पाठीवर सॅक घेतलेले कॉलेजवीर,मुलांना शाळेत सोडण्यास आलेल्या महिला.जरीच्या साड्या नेसून लग्नाला निघालेल्या महिलामंडळ, आजी देवळात तर आजोबा दवाखाण्यात निघाले होते व त्यातच रस्त्यावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडलेले होते. 

रिक्षात बसल्यावर रिक्षा वाहतुकीतून वाट काढत काढत पुढे सरकत होती. आजही आपल्याला उशिर होणार असे वाटू लागले.तेवढ्यात रिक्षाने स्टेशन गाठले.गाड्या उशिरा घावत असल्याने प्लॅटफॉर्मवर गर्दी ओसडत होती. तीनचार गाड्या सोडल्यानंतर कसातरी गाडीत घुसलो. नेहमीची गाडी न मिळाल्याने मित्र नाराज झाले. त्या गाडीतल्या मित्रांनी खाण्याचे पदार्थ आणल्याचे व तसेच येत्या रविवारी कर्जतला रिसॉर्टवर पिकनिक ठरवल्याचे फोनवरून सांगितले.गाडीत गर्दी खूप असल्याने घुसमटायला झाले. घामाच्या धारा लागल्या होत्या. ’दादर’नंतर श्वास घेण्यास मिळाले. चर्चगेटला उतरल्यावर गर्दीतून बाहेर पडण्यास बराच वेळ गेला.पुढचा प्रवास बसमधून उभ्याने करीत ऑफिसला पोहचलो.

धावत पळत कसतरी मस्टर गाठलं होतं.पाच मिनिटे बसून श्वास घेतला नाही तोपर्यत साहेबांचे बोलवणं आलचं.साहेबांना भेटून आल्यावर चहा व नास्ता केला आणि कामाला लागलो. खूप वर्षे एकत्र काम केलेला माझा सहकारी निवॄत होत असल्याने आज ऑफिसमध्ये गडबड होती.दुपारी जेवण व नंतर निरोप समारंभाचा कार्यक्रम झाला.त्यातच कामही सुरु होते.घरचे व मित्रांचे फोन घेत होतो. सेवानिवृत सहका-याला भेटण्यात वेळ गेल्याने संध्याकाळी निघण्यास उशिर झाला.गाडीत बरीच गर्दी होती. पण गाडीत बसायला व त्यातच विंडो सिट मिळाल्याने सुखावलो.प्रत्येक प्रवाशी मोबाईमध्ये व्यस्त होता.काही चित्रपट तर काही मॅच पाहत होते.काहींनी गाणी ऐकत प्रवास सुरु केला.पुढच्या प्रत्येक स्थानकांवर गाडीत गर्दी होत गेली.मला मात्र गर्दीतून बाहेर उतरण्यास बराच त्रास झाला.गाडीतून मला बाहेर फेकून दिले होते.पडता पडता स्वत:ला सावरले होते.

स्टेशनच्या बाहेर रस्त्यावर वाहनांची व माणसांची बरीच गर्दी होती. भाज्या व इतर गोष्टींची खरेदी करीत व गर्दीतून वाट काढीत सोसायटीत पोहचलो.सोसायटीत मंडळी माझी वाट पाहतच होते.बॅग घरी पाठवून दिल्यानंतर सोसायटीतील काम करण्यात बराच वेळ गेला.सोसयटीतील प्रश्न सोडवून घरी गेल्यावर फ्रेश होऊन सरळ जेवायला बसलो.जेवतानाच संपूर्ण दिवसाचा आढावा घेतला. टि.व्हि.वर बातम्या पाहिल्या.पोस्टाने आलेली सोसायटीची पत्रं पाहिली. काही फोन घेतले व केले. आईबाबांची विचारपूस केली व उद्याची तयारी करून लवकरच झोपलो.         

अचानक एका दिवसाची आठवण झाली. काय होते ते धावपळीचे जीवन? विचार करायला जराही वेळ मिळत नसे.पुढच्या दिवसांचे नियोजन झालेले असायचे.सर्वांचे जीवन धावपळीचे झाले होते.

आता...........   

No comments: