Saturday, November 16, 2024

बारा वाड्यांचं "आगरवायंगणी"

                                                             "आगरवायंगणी" 



                                                 मुंबई आवॄती      १६.११.२०२४ 




                                                         पुणे आवॄती  १३.११.२०२४   



Monday, July 1, 2024

सुखद क्षणांसाठी ’गझिबो’

                                             

                                                                                      


                                                    



                                                  सुखद क्षणांसाठी ’गझिबो’

      

कोकणात सुंदर कौलारु घर बांधलं. छोटीशी बाग फुलवली.सारखं काहीतरी कमी वाटत होतं. मुंबईत बंगल्याच्या बाजूला एक गझिबो असतो तसा आपल्या घराच्या बाजुला एकही भिंत नसलेला गझिबो बांधला.घराची शोभा आणखी वाढली.झाडांच्या सावलीत व मोकळ्या हवेच्या ठिकाणी असलेल्या हा गझिबो सगळ्यांना तेथे रमायला खुनवत असतो.


घराएवढाच वेळ माझा गझिबोत जातो.गझिबोत सकाळच्या प्रसन्न वेळी पक्षांचे मधूर संगीत ऐकतो तर दुपारी दाट सावलीत पुस्तक वाचताना खुर्चीत कधी झोप लागते तेच कळत नाही. संध्याकाळी गप्पा मारायला गावक-यांना आमचा गझिबो खूपच आवडीचा वाटतो. 


गझिबोच्या बाजूला सुंदर फुलांची झाडे लावली आहेत. व वेली गझिबोवर सोडल्या आहेत.या फुलांवर फुलपाखरं बागडताना पाहण्याचा आंनद अवर्णनीय आहे.गझिबोच्या समोर भागात गवताचे लॉन लावणार आहे.पावसात पाण्याचे तुषार अंगावर झेलत बसून पावसात भिजत राहतो. रात्री काजव्याच्यासह आकाशातले तारेतारका पाहत जागत राहतो.दिवाळीत दिव्यांनी गझिबो सजवतो.एकूणच मनात भरभरून चैतन्य निर्माण करणारे क्षण. 


गझिबोत मी संगीत ऐकतो,शांतपणे लिखाण करतो,वाचन करतो,गप्पा मारतो, निसर्गातली फोटोग्राफी करतो व बाजूच्या झाडांची निगराणी करताना किती वेळ जातो तेच कळत नाही.

’गझिबो’, माझ्या घरातले माझ्या आवडीचे ठिकाण झाले आहे.


जिथे कोवळ्या स्वप्नांना नवं क्षितिज दिसावं,कितीही खचलो कधी तरी नवीन उमेद मिळावी,मित्रमैत्रिणींच्या गप्पांची गाठोडी बांधली जावीत,कडवट आठवणी विसरून नवीन वाट दिसावी,बाहेरच्या कोलाहलापासून दूर माझा गझिबो ही माझी एक हक्काची जागा झाली आहे.



घरातला असा एकतरी कोपरा असतो की जो नुसता घराचा कोपरा नाही तर आपल्या मनाचा कोपरा असतो.. 

Tuesday, July 25, 2023

थरार अनुभवला


’थरार अनुभवला’ हा लेख महाराष्ट्र टाईम्स (०६.०७.२०२३) या वृतपत्राच्या पुरवणीत प्रसिध्द झाला आहे. 






रिव्हर राफ्टिंगचा थरार 

जीवनात आपल्या सर्वांची वैशिष्ट्येपूर्ण अशी ध्येय असतात, काही मनात इच्छा आकांक्षा असतात. कागदावर वर जरी आपण ही लिस्ट ,यादी लिहलेले नसली तरी मनात मात्र कुठं तरी ती खोल दडलेली असते आणि वेळोवेळी आपल्या आठवण करून देत असते. अशीच माझी बकेट लिस्ट मोठी आहे. ती पूर्ण करण्यासाठी ची माझा प्रयत्न सुरु आहे. या बकेट लिस्ट मध्ये रिव्हर राफ्टिंग करण्याची इच्छा लिहून ठेवली आहे. मनात राहून गेलेल्या गोष्टींपैकी ही एक गोष्ट आहे. पाहिलेली स्वप्न जेव्हा पूर्ण होतात तेव्हा होणारा आनंद काही निराळाच असतो.

रिव्हर राफ्टिंग चे साहस करण्याची संधी मिळाली होती पण पाण्याच्या भितीने माझ्या कडून राफ्टिंग करण्याचे धाडस झाले नाही. आम्ही कॉलेजमधले मित्र ३० मार्च २०२३ रोजी  कोलाड जवळील सुतारवाडी या गावातील एका मित्रांच्या फार्म हाउस गेलो होतो. तेथे रिव्हर राफ्टिंग करण्याची पुन्हा संधी चालून आली. सगळ्या मित्रांनी साठी गाठलेली असली तरीही  काही मित्र रिव्हर राफ्टिंग करण्यास  पटकन तयार झाले  पण काही  मित्र भितीने राफ्टिंगच्या सुरक्षेची चौकशी करु लागले. संध्याकाळी रिव्हर राफ्टिंगबद्दलची योग्य माहिती देण्यासाठी व जाण्याचे नक्की करण्यासाठी मंडळी भेटून गेली. राफ्टिंगची माहीती मिळाल्याने थोडा धीर आला. सुरक्षेबद्दलच्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाल्यावर व सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिल्याने सगळ्यांनी राफ्टिंग जाण्याची तयारी केली.आम्ही आयुष्यातला पहिलाच रिव्हर राफ्टिंगचा अनुभव घेण्याचे ठरवले.

सकाळी साडेसात वाजता गावातून राफ्ट जीपवर चढवून ’कुंडलिका’ नदीच्या दिशेने निघालो. रोज सकाळी भिरा धरणातून एका गेटमधून ’कुंडलिका’ नदीत पाणी सोडले जाते. या नदीतील धरणातून सोडलेल्या पाण्याच्या वेगावर राफ्टिंग केले जाते. त्या दिवशी धरणातून दोन गेटमधून नदीत पाणी सोडल्याने पाण्याला वेग होता. जीपवरुन राफ्ट उतरवून नदीत सोडला. लाईफ़ जॅकेट चढवली व वल्हे घेतली. प्रशिक्षकाने राफ्टमध्ये बसण्याची सुचना केल्यावर आम्ही सगळे देवाचे नाव घेऊन  राफ्ट्मध्ये पहिल्यांदा बसलो. पाण्यात जाईपर्यंत सगळेच शूरवीर होतो, पण ते दूरवर पसरलेलं पाणी बघून मनामधे हळूहळू भीती जमा होऊ लागली होती. प्रशिक्षक राफ्टमध्ये कसे बसायचे यापासून वल्हे कसे मारायचे याची माहीती देत होता.अपघात झाला तर न धाबरता शांत रहा .मी तुम्हाला पुन्हा राफ्ट्मध्ये घेणार याची खात्री मिळाल्यावर आमची थोडी भिती कमी झाली.

राफ्टने नदीचा किनारा सोडला. पाण्याच्या वेगाने राफ्ट वेगात पुढे जाऊ लागला. प्रशिक्षक  सुचना देत होता. नदीचा प्रवाह वळणा वळणाने  फेसाळत खडकातून मार्ग काढत वाहत होता. संथ पाण्यावर राफ्ट सरळ तरंगत पुढे जात होता. पण खडकाळ भागात पाण्याला वेग असल्याने राफ्ट देखील वेगात पाण्याच्या प्रवाहातून आपला मार्ग शोधून काढत असतो. त्यावेळी राफ्टींग किती साहसी खेळ असलेल्याची जाणीव असते. खळखळत्या प्रवाहातून जाताना राफ्ट खाली वर होतो. पाणी राफ्टमधे येते आपण पूर्ण  भिजून जातो. त्यावेळी खूप भीती वाटते. रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवला. या राफ्टींग मध्ये चार (रॅपिड्स) ठिकाणी पाण्याचा प्रवाह आपली परीक्षा घेतो.  प्रशिक्षकाने  दिलेल्या सुचनेचे  योग्य पालन केल्याने त्या परीक्षेत आम्ही सगळे मित्र पास झालो. आम्ही जेष्ठ असूनही आमच्या कामगिरीवर प्रशिक्षकखुष झाला. पुढे पाण्याचा प्रवाह शांत झाल्यावर आमच्या कडून प्रशिक्षकाने  वेगवेगळे प्रकार करुन घेतल्याने मजा आली. पाणी संथ वाहत असल्याने राफ्ट शांतपणे प्रवाहात पुढे जात होता. आम्हाला पाण्यात पोहण्यास सांगितले. राफ्ट किना-याला घेत त्यांनी आम्हाला राफ्ट मधून सुरक्षित खाली उतरवले. राफ्टिंगचा आनंद घेतल्याने सर्व मित्रांनी प्रशिक्षकाचे आभार मानले. आमची सफर मस्त पार पडली.

माझ्या बकेट लिस्टमधली एक गोष्ट पूर्ण झाल्याने आनंद झाला. छोट्या छोट्या गोष्टींनी का होईना पण अजून ही माझी बकेट लिस्ट अजून भरलेलीच आहे. बकेट लिस्टमधली उरलेली स्वप्न पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. 





 

Monday, June 19, 2023

गावपण अनुभवण्यासाठी

 

०६.०६.२०२३  रोजी हा लेख महाराष्ट्र टाइम्स  या वॄतपत्रास ’पहिल्या घराची गोष्ट’ या सदरात  प्रसिध्द झाला आहे 





पहिल्या घराची गोष्ट 


कौलारू घराची स्वप्नपूर्ती  



शहरात राहिल्याने गडबड गोंधळाचा कंटाळा आलेला असतो. मोकळी शुद्ध हवा श्वासात भरून घ्यावीशी वाटते. कारण काहीही असू दे, गावामधले घर कौलारू प्रत्येक संवेदनक्षम माणसाला साद घालत राहते.  हे कौलारू घर म्हणजे सकारात्मक उर्जेचा स्त्रोत आहे. कोकणातल्या पाऊलवाटा नष्ट झाल्या. दिव्याचे कंदील इतिहासात जमा झाले, विहीरीला पंप बसले, लालमातीची धूळ खाली बसून त्यावर डांबरीकरण झाले, पण कौलारू घराची सय जात नाही.  शहरात सर्व असताना व ग्रामीण जनता मुंबईकडे मोठय़ा संख्येने आकर्षित होत असताना गावाचे आकर्षण मनाला का वाटत असावे? कदाचित गावाकडची माती साद देत असते. गावाच्या आठवणीने स्वप्ने होती सुरू खेडय़ामधले घर कौलारू


ठाणे शहरात माझे स्वत:चे घर आहे. गावाला आमचे घर नव्हते. एक छानसे सुंदर, टुमदार घर असावे, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. प्रत्येकाने आपल्या मनात आपल्या घराविषयी काहीतरी कल्पना रचलेल्या असतातच. कोकणाची ओढ असल्याने सेवानिवृत्त होण्यापूर्वी गावाला स्वत:चे कौलारू घर बांधायचे स्वप्न होते. ठाण्याहून दापोलीला जाऊन घर  उभारण्यास खूप मेहनत घ्यावी लागली. कर्ज घ्यावे लागले. पुणे, दापोली व ठाणे असा सारखा प्रवास सुरु होता. त्यावेळी ’घर पाहावे बांधून’ याची प्रचिती आली होती. माझे घराचे स्वप्न सेवानिवृत झाल्यावर पूर्ण झाले. दापोलीजवळ एक गृहसंकुल म्हणजेच छोटेसे गाव उभे राहत आहे. त्या गृहसंकुलात छोट्याश्या जागेवर छोटेसे घर बांधले आहे. माझे नवे घर पारंपारिक पध्दतीने म्हणजेच जांभ्या दगडांच्या भिंतीचं आणि कौलारू छपराचं आहे. कोकणात प्रामुख्याने मुबलक प्रमाणात जांभा दगड मिळत असल्याने इथली घरे जांभ्या दगडाची म्हणजेच चिर्‍याची आणि पावसामुळे उतरत्या कौलारू छपराची असतात. प्रत्येकाची आपल्या घराची कल्पना वेगळी असते, आपलं घर इतरांहून वेगळं असावं, वेगळं दिसावं या अनुषंगाने मी पण माझ्या घरात माझ्या भावना जपल्या आहेत. घर जास्त मोठे नसावे पण निसर्गात विलीन होणारे असावे. उजेड पुरेपूर असावा. घरात मानवनिर्मित ऊर्जेचा वापर कमीत कमी असावा,असेच माझं घर आहे. गृहसंकुलात शहरातील सगळ्या सुविधा असल्यातरी जांभ्या दगडांच्या व कौलारू घरानं गावपण अनुभवायास मिळत आहे. घरात गेल्यावर सुख व समाधान मिळते.घरात राहिल्याने आनंद मिळतो. 


घर हा शब्द जरी दोन अक्षरांचा छोटा शब्द वाटत असला तरी देखील त्या शब्दाच्या मागे भावनिक आधार फार मोठा आहे. माझे घर आकाराने खूप मोठे ही नाही आणि छोटे की नाही पण अगदी टुमदार आहे. घराच्या अवतीभोवती सुंदर बाग केलेली आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याचे कोवळे ऊन घरात शेवटपर्यंत पडते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये कोवळ्या उन्हाचा आनंद फारच मजेशीर वाटतो. संध्याकाळी सुर्यास्त होत असताना देखील घरातून पाहता येते.


माझे नातेवाईक व मित्रमंडळी माझ्या नव्या घरी येऊन राहिल्यावर खुष होऊन परत येण्याची इच्छा व्यक्त करून शहराकडे परततात. 



Friday, November 25, 2022

नव्या दोस्तांसह सजली मैफल

 





                                               नवी दोस्ती 



दापोलीच्यापुढे दाभोळ रस्त्यावर २० किलोमीटरवर आगरवायंगणी या गावाजवळ ’कोकण ट्रेल’ नावाचे मोठे गॄहसंकुल विकसित होत आहे. येथील परिसर व हवामान खूपच छान असल्याने येथे मुंबई व पूण्यामधील निसर्गप्रेमींनी घरे घेतली आहे. काही घरे तयार झाल्याने त्या घराचा ताबा मालकांना दिला आहे. तर काही घरे लवकरच पूर्ण होणार आहेत.


नव्या घरात दिवाळी साजरी करण्यासाठी काही कुंटुंब येथे राहण्यास आली होती. मुंबईतले श्री.बिपीन छेडा, ठाण्य़ातून मी आणि पूण्यातून श्री.शिरीष लिमये व श्री.सचिन शेटे अशी चार कुंटुंब दिवाळीच्या पहिल्या दिवशी तेथे गॄहसंकुलात राहणार होती. अदल्या दिवशी मी व पत्नीने आमच्या गॄहसंकुलाच्या स्वागतकक्षात ’दिवाळी पहाट’ कार्यक्रम करण्याचा बेत आखला. चार कुंटुंबात काय दिवाळी पहाट करणार? पण या वर्षी सुरुवात तर करुया असे आम्ही ठरवले. मी व पत्नीने इतर तीन कुंटुंबाना फोन वरुन दिवाळी पहाटची संकल्पना सांगितली. उद्या सकाळी आठ वाजता स्वागतकक्षात पारंपारीक गणवेषात आपल्या कुंटुंबातल्या सर्व सदस्यासह जमावयचे आहे. गाणी,विनोद, नकला, नाच जे जमेल ते करायचे आहे. शेवटी दिवाळी फराळ फस्त करायचा.असा एक दिड तासाचा कार्यक्रम ठरला. बाजुच्या गावातून स्पिकरची सोय झाली. कार्यक्रम ठरला पण उद्या मडंळी जमतील की नाही याची भिती वाटत होती.


दिवाळीचा पहिला दिवस उजाडला. आम्ही पहिली आंधोळ करून देवाची पुजा करून फराळ घेऊन स्वागतकक्षात पोहचलो. तेथे कोणीच आले नव्हते.प्रथम श्री.बिपीन छेडा पत्नीसह आले नंतर श्री.शिरीष लिमये व श्री.सचिने शेटे कुंटुंबासह जमले. आता आपण छोटासा कार्यक्रम करु  शकतो याची  मला खात्री पटली. सर्वांनी एकामेकांना दिवाळीच्या शुभेछा दिल्या. श्री प्रतिभा लिमये यांनी प्रथम      ’स्वच्छंद निर्मळ वाहतो निर्झर’ हे  गाणं गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. दिवाळीच्या पहाटे थंड वातावरणात प्रसन्न वाटत होते. प्रत्येकाने करमणूक करायचे ठरले. नंतर पत्नीने ’अच्युतम केशवम’ हे भजन घेतले. कुमारी स्मेरा शेटे हिने छान नाच केला आणि माहोल बदलून टाकला. सर्वांना वाटू लागले आपणही काय तरी केले पाहिजे.’जगी ज्यास कोणी नाही’,’आनंदाच्या डोही आनंद तरंग’ अशी बरीच मराठी गाणी झाली. श्रीमती मिनल शेटे यांनी आपल्या मुलीसह सुंदर नाच केला. सर्वांना नाच खूप आवडला. छेडा कुंटुंबियांनी गुजरातीत एक गाणे गायले. श्री.शिरीष लिमये यांनी देखील हिंदीत गाणे गायले. सगळ्याचा उत्साह वाढला होता. आम्ही चार पुरुषांनी ’ये दोस्ती नही तोडेंगे’ हे गाणे गायले. गरबा केला. नंतर मी पत्नीसह ’महाराष्ट्र गीत’ घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. गॄहसंकुलात कामाला आलेले गावकरी आमच्या कार्यक्रमाचे प्रेक्षक झाले होते. फराळ व चहापाणी करून आम्ही आंनदाने आपापल्या घरी परतलो. कार्यक्रमाचे फोटो व व्हिडियो पाठवल्यावर सगळी मंडळी खूष झाली. अगोदर काहीच तयारी नसताना कार्यक्रम छान झाला. 


दिवाळीनंतर एक मोठे ’गेट टुगेदर’ ठरले होते. दिवाळी आपल्या घरी साजरी करून या कार्यक्रमाला श्री.सागर,श्री.दिक्षीत,श्री.दिवेकर व श्री.पार्ले ही कुंटुंब सामील झाली होती. गेम व हौझी झाले. पाणी पुरी,रगडा पॅटीस,शेव पुरी व भेळ असे पदार्थ ठेवले होते.सगळ्यांनी ताव मारुन मजा केली. गेममधली बक्षीस वाटली.       


या दोन्ही कार्यक्रमाने आम्ही सगळे घरमालक व कुंटुंब एकत्र आले. नव्याने ओळखी झाल्या. नवे दोस्त मिळाले. नवी दोस्ती सुरु झाली.  या वर्षाच्या अखेरीस परत भेटण्याची उत्सुकता सगळ्यांनी दाखवली आहे. 


Tuesday, July 19, 2022

आजी आजोबांच्या सहवासातील सुंदर क्षण

 






जिव्हाळ्याचे गाव


मुंबई गोवा या महामार्गावर इंदापूर नंतर तीन किलोमीटर वर ’विघवली’ या गावाचा फाटा लागतो. तेथून आत दिड किलोमीटरवर ’विघवली’ हे गाव डोंगराच्या कुशीत असून गर्द वृक्षराजीत वसलेले आहे. कौलारू घरांचे सुंदर  गाव आहे.निसर्गमय आणि हिरवाईने नटलेला परिसर पाहून नक्कीच कोणीही गावाच्या प्रेमात पडेल असा आहे. गावातील निसर्ग हाच तर खरा खजिना आहे. फाट्याहून  गावात जाण्याच्या रस्त्याच्या दुतर्फा भातशेती आहे.गावकरी भातशेतीवर आपला उदरनिर्वाह करीत असत. गावात शाळा, तीन देवळे व तीन विहिरी  आणि एक सुंदर तळे आहे. होळी, गणपती, दहीहंडी व पालखी असे उत्सव आनंदात साजरे होतात. अशा या आजोळी मी लहानपणी सुट्टीत कायम यायचो. माझ्या बालपणाच्या इतिहासातील काही सोनेरी पाने. बालपणी आजोळाला एक अनन्यसाधारण स्थान असते. आजोळाचे गाव म्हणजे एक आठवणी देणारं रम्य ठिकाण. 


आजोबाआजी,मामामामी व मावश्याकाका असे मोठे कुटुंब एका मोठ्या घरात एकत्र राहायचो. घराच्या समोर अंगण, त्यावर गवताचा मांडव, ओटी, देवघर, माजघर, स्वयंपाकघर, पडवी आणि मागे परस आहे. गावात घराला लागून घर  आहेत. त्या काळात गावात वीज नव्हती. रात्रीच्या अंधारात दिवे मिनमिनत असत. 


कोंबड्याच्या आरवण्याने व जात्यावर दळण्याचे आवाज आणि परसातील झाडांवरील पक्ष्यांचे किलबिलाटाने पहाटे जाग येत असे. गोठ्यातील गाई-म्हशीचे हंबरणे ऐकू येत असे. सकाळी दूध काढत असू. गुरांना चरायला सोडायचो. आजीच्या हातचा खमंग पदार्थ यामुळे न्याहारीला लज्जत येते. आजीने केलेली साधी भाजी-भाकरीही चवदार लागते. घराच्या मागील डोंगरावरील रानात स्वछंदी भटकायचो. बैलगाडीत बसून शहरात जात असू. घरातली सर्व मंडळी शेतावर काम करण्यास जात असत. शेतावरचे जेवण खूपच चविष्ट लागायचे. शेतावरील पेरणी,लावणी,कापणी व झोडपणीची कामे करताना मजा यायची. नांगर धरायचो. कालव्यात पोहून मग घरी येत असू. निरांजनातील वातीच्या उजेडात शुंभकरोती झाल्याशिवाय जेवण मिळत नसे. कंदीलाच्या प्रकाशात जेवण व्हायचे. भूक लागलेली असल्याने जेवण जास्त जात असे.वीज नव्हती तरी काहीही अडत नव्ह्ते. रात्री काही वेळ गोष्टी ऐकताना व आकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण सुरु असताना कधी झोप लागायची हेच कळायचे नाही. मला माझे आजोळ अजूनही अतिशय प्रिय आहे. 


गावातील कालव्यात डुंबत राहण्यात, बैलगाडी पळवण्यात, मासे मारण्यात, गुरांशी खेळण्यात, रानोमाळी आंबे,जांभळे व करवंदे गोळा करण्यात आणि स्वच्छंद भटकण्यात सुट्टी कधी संपते ते समजत नव्हते. अशा या मंतरलेल्या वातावरणातून परतण्याचा दिवस उगवायचा. गावातून आणलेल्या सामानात आजीने दिलेल्या डांग-मेतकुटाची भर असे आणि आजी-आजोबांच्या सहवासातील अमृतमधुर आठवणी मनात रुंजी घालत असायची. उन्हाळ्यातील दोन महिने व दिवाळीतील पंधरा दिवस सुट्टीत मजा करून मुंबईला परतत असू. गावातल्या आजोबाआजीला पत्र पाठवित असू. लहानपणीच्या रम्य आठवणी आाताही आजच घडल्याप्रमाणे आठवतात. कायमच्या स्मरणात राहिल्या आहेत. गाव तसाच राहिला आहे पण आवडीची माणसं राहिलेली नाहीत. आजोळाची ओढ मनात एक खास जागा घेऊन राहली आहे. 

 

आजोळ म्हंटलं की मनात असंख्य आठवणी दाटतात, सुरकुतलेल्या हातांचा मायेचा स्पर्श आठवतो. प्रत्येकाच्या मनातल्या एका कप्प्यात आजी आजोबांसोबतच्या क्षणांचा खजिना दडलेला असतो.  कितीही मोठे झालो व शहरात राहिले तरी गावात येऊन तेथील निसर्गाचा अनुभव आपल्याला नेहमी चांगली ऊर्जा आणि काहीतरी नवीन शिकवण देण्याचे काम करत असतो. 



Wednesday, March 30, 2022

तारुण्यातील सोबती

                                   १५.०३.२०२२ रोजी महाराष्ट्र टाईम्स या वृतपत्रात प्रसिध्द झालेला लेख 




            तरुणाईतील सोबती   (गाडी माझी भारी)

मी कॉलेज पूर्ण करुन नोकरीला लागलो होतो. पैसे जमवायचे आणि आवडेल तशी बाइक घ्यायची,असे स्वप्न पाहू लागलो. १९८३ च्या काळात मोटर सायकल आता सारख्या दुकानात जाऊन खरेदी करता येत नव्हत्या. कंपनीमध्ये काही रक्कम भरून मोटर सायकल बुक करावी लागत असे. घरात कोणाला न सांगता मी ’सुझुकी’ या कंपनीच्या जाहिराती प्रमाणे पैसे भरून मोटर सायकल बुक केली. गाडीची वाट पाहता पाहता एक वर्ष गेले. एका दिवशी कंपनीचे पत्र आले.आपली गाडी उपलब्ध आहे पैसे भरुन दुचाकी घेऊन जाणे. घरात ही बातमी दिल्यानंतर घरातून गाडी घ्यायला विरोध झाला. मी सर्वाना विश्वासात घेतले पण काही उपयोग झाला नाही. दुचाकीचे खूपच अपघात होतात या भितीमुळे गाडीसाठी विरोध होत होता.शेवटी मी हट्टच केला. तेव्हा बाबांनी रागाने मला बॅकेचे पासबुक आणून दिले. तुला काय करायचे ते तु कर. आम्हाला काही विचारू नकोस.

मी पैसे भरले व घाबरत घाबरत गाडी घरी घेऊन आलो. आमच्या कुंटुबातील ही पहिलीच गाडी पाहिल्या नंतर सर्वांनी तिचे स्वागत केले.बाबांनी दुचाकी सावकाश चालव व सुरक्षित चालव असा मोलाचा सल्ला दिला.मी गाडी चालवण्यास शिकलेलो होतो.पण गाडी चालवण्याचा परवाना नसल्याने मोठ्या रस्त्यावर गाडी चालवण्यास जात नव्ह्तो.काही महिन्यानंतर मित्रासोबत जाऊन परीक्षा देऊन परवाना मिळवला आणि सुसाट निघालो.  

काही दिवसांनी रोज ऑफिसला दुचाकी घेऊन जाऊ लागल्याने सोयीचे वाटले. येताना जाताना सर्वांची कामे करू लागलो. मित्रांकडे अशी गाडी नसल्याने जरा भाव खाऊ लागलो.त्यांना घेऊन लांब लांब फिरण्यास जाऊ लागलो.घरात कोण आजारी असले तर त्याला गाडीवरून दवाखान्य़ात नेत होतो.बाजारहाट करायचो.गाडी असल्याने घरच्यांची व शेजा-यांची कामे करीत असे.


मी गाडीला खूप जपत होतो. रोज साफ करीत गाडी स्वच्छ ठेवत असे.तिच्या प्रेम जडले होते.एकादा चरा पडला तर वाईट वाटायचे. मित्रांसोबत मोटर सायकलहून लांबलांबच्या मोहिमा यशस्वी केल्या. भावाला घेऊन गावाला जात असे. जसे मी गाडीला जपले त्याच प्रमाणे गाडीनेही मला जपले कोठे अपघात झाला नाही व कधीच कसला त्रास दिला नाही.

लग्न ठरल्यानंतर होणा-या बायकोला गाडीवरून खूप फिरवले.तिला गाडीवरून फिरायला आवडायचे पण मी गाडीवरचे प्रेम दर्शवले की ती नाराज होत असे. लग्नाच्या गडबडीत तर गाडीला दम खायला वेळ मिळाला नाही. लग्नाच्या धामधुमीत आमंत्रणापासून खरेदीपर्यत सर्व कामे गाडीच्या मदतीने केली. तिची मला कायम सोबत मिळाली.

माझी लाडकी दुचाकी गाडी काही वर्षानंतर म्हातारी झाली. काय करायचे काही ठरत नव्हते. शेवटी एका सामाजिक संस्थेला त्यांना ग्रामीण भागातील त्यांच्या कार्यासाठी वापरण्यासाठी दिली. भंगारात टाकण्यापेक्षा कोणच्या तरी काही कालावधी तरी उपयोगात येईल, असा विचार करीत गाडीचा निरोप घेतला. रोजच्या सवयीमुळे काही दिवस मला गाडीची खूप आठवण येत होती. तिच्या सारखीच दुसरी दुचाकी घरी आणली.      





Wednesday, August 4, 2021

मृत्यूची झुंज अपयशी ठरली


वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला स्पायनल मस्क्लुअर अॅट्रॉफी म्हणजेच एमएमए टाइप वन हा दूर्मिळ आजारा झाला होता. या आजारावर मात करण्यासाठी वेदिकाला १६ कोटींच्या इंजेक्शनची गरज होती.वेदिकाला जून महिन्यात १६ कोटी रुपयांचं झोलगेन्स्मा इंजेक्शन देण्यात आलं होतं. लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शनची व्यवस्था केल्यानंतरही पुण्यातील वेदिका शिंदे या चिमुकलीचं निधन झालं आहे.खूप वाईट वाटले.





पुण्यातील भोसरी येथील सौरभ शिंदे यांची ११ महिन्यांची चिमुकली वेदिका शिंदे.वेदिकाला हा आजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिचे आईवडील चांगलेच हादरले होते. मात्र, नंतर हिम्मत न हारता त्यांनी वेदिकावर उपचार करण्याचे ठरवले. वेदिकाला देण्यात येणारे इंजेक्शन बाहेरील देशातून मागवावे लाग्णार असल्याने वेदिकाच्या कुंटुबीयांनी मदतीचे आवाहन काही महिन्यांपूर्वी केले होते.त्यांच्या आवाहनाला साद देत जनतेनी भरभरुन प्रतिसाद दिला व सर्वच थरातून तिला मदातीचा ओघ सुरु होता.केंद्र सरकारने इंजेक्शनचे सहा कोटी रुपयांचे आयात शुल्क माफ केले होते. वेदिकाला इंजेक्शन दिल्यानंतर वेदिका पूर्ण बरी होऊन घरी आली होती.तेव्हापासून तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.एवढे सारे प्रयत्न करुनही वेदिकाचे प्राण वाचू शकले नाहीत.


मुलगी गेल्याचं दु:ख असतानाही वेदिकाच्या वडिलांनी सामाजिक बांधिकली जपल्याचं पाहायला मिळत आहे. वेदिकाचा मृत्यू इंजेक्शन दिल्यानंतरही कसा झाला, असा चुकीचा प्रश्न उपस्थित करु नका, असं आवाहन सौरभ शिंदे यांनी केलं आहे.    


गेली सहा महिने तिच्या जगण्याचा संघर्ष सुरू होता, मात्र तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली.तिच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 


हे औषध भारतात उपलब्ध करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असं पालकांचं म्हणणं आहे.हे औषध बनवणा-या कंपन्या त्यांच्याकडून काही बाळांना ही इंजेक्शन्स मोफत देतात. पण ती फार बाळांना मिळू शकत नाहीत.जे पालक पैसे उभे करून इंजेक्शन घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी किंमती कमी केल्या जात नाहीत. अशावेळी आपल्या सरकारनेच जर या कंपन्यांना भारतात औषध उपलब्ध करून द्यायला सांगितलं, तर या कंपन्यांना तसं करावंच लागेल. या आजारातल्या लहान बालकांना वाचवले  पाहिजे.


’वेदिका’चा हसरा चेहरा डोळ्यासमोरून जात नाही. आईवडीलांसाठी हे मोठे दु:ख आहे. 

Monday, July 19, 2021

दहावीचा निकाल

 



राज्यातील शिक्षण मंडळाने दहावीचा अंतर्गत एकूण निकाल (मुल्यमापनाच्या आधारे) ९९.९५ टक्के लावला आहे.यावर्षी करोनाच्या संसर्गामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. दहावीची परीक्षाच झाली नसताना शिक्षण मंडळाची निकाल लावण्याची ही पहीलीच वेळ होती. यावर्षी दहावीचा अभ्यासक्रम, अभ्यास व निकाल सर्वच ऑनलाईन होते.राज्यातील सगळ्या विभागांचा निकाल ९९ टक्के लागला आहे. २०२१च्या दहावीच्या परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. तर ८३ हजार ९६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.सरसकट पास न करता प्रत्येक विद्यार्थ्यांला मुल्यमापनाच्या आधारे गुण मिळाले आहेत.


यावर्षी दहावीच्या परीक्षेच्या निकालाला फारसे महत्व मिळाले नाही.निकाल कधी लागून गेला तेही कळलं नाही. दरवर्षी निकालाच्या तारखा आधी जाहीर व्हायच्या.निकालाचा दिवस जसा जवळ येऊ लागला की विद्यार्थ्यांची व पालकांची धास्ती वाढत असायची. निकालच्या रात्रीला विद्यार्थ्यांना झोपही लागत नसे.निकालाच्या दिवशी घाबरत घाबरत शाळेत जाऊन गुणपत्रिका घेऊन प्रथम गुण पाहिले जात.गुण किती मिळालेत यावर आंनद कसा साजरा करायचा ठरायचं. नातेवाईकांचे फोन येऊ लागलेले असायचे. अपेक्षेप्रमाणे 

गुण मिळाले असतील पालक खूष नाहीतर ’जरा जास्त अभ्यास केला असतास तर त्याच्या ऐवढे गुण मिळाले असते’ यासारखी वाक्य ऐकायला लागत होती. निकालानंतर दुस-या दिवशी वृतपत्रांमध्ये विद्यार्थ्यांचे फोटो व मुलाखती प्रसिध्द होत असत. शाळा  व  खासगी क्लासवाले या विद्यार्थ्यांच्या नावाने जाहीरात करत असत.जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार होत असत.ते हुशार विद्यार्थ्यी शाळेत व चाळीत पेढे वाटायचे. कमी गुण मिळालेले विद्यार्थ्यी मात्र नाराज होत. यावर्षी जो विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाल्याचं व्हॉट्सअ‍ॅपवर कळतं त्या विद्यार्थ्यांच्या नावाने शुभेच्छा देण्यात येत आहे. यावर्षी शंभर गुण मिळालेल्या विद्यार्थ्यींना देखील मान मिळाला नाही. 


यावर्षी दहावीची परीक्षा देऊन असे गुण मिळवले असते तर विद्यार्थ्यीं जास्त आनंदी झाले असते. हुशार विद्यार्थ्यांचे या प्रकाराने मोठे नुकसान झाल्याने ते नाराज झाले आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ’करोना’ हा शेरा न मिळाल्याने सर्व विद्यार्थ्यी व पालक खूष झाले आहेत. दहावीच्या विद्यार्थींना अकरावीच्या प्रवेशात प्राधान्य मिळवण्यासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे.


दहावीची परीक्षा हा उज्ज्वल भविष्याचा पाया मानला जातो. यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा !

Monday, July 5, 2021

MPSC

 MPSC


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी न मिळाल्यामुळे पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणानं आत्महत्या केली. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. राज्यभरात  स्वप्निलने केलेल्या आत्महत्येचे पडसाद उमटले.


एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने महाराष्ट्रात आहेत.पुणे     हे अशा स्पर्धा परीक्षांच्या तयारीचं केंद्र बनलेलं आहे.या परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यी कर्ज घेतात. परीक्षा किंवा नोकरी मिळण्यास काही अडचणी आल्या की कर्ज वाढत गेल्याने विद्यार्थ्यी खचतात. नकारात्मकता वाढत गेल्यावर मनाने खंबीर नसलेले विद्यार्थ्यी आत्महत्या निर्णय घेतात.


स्वप्निलने आत्महत्त्येला कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसल्याचे लिहून ठेवले आहे. तर मग यास कोण जबाबदार आहे? आरक्षणावर तोडगा काढण्यात हतबल ठरलेले प्रशासन की कोविडची साथ की नैराश्यात गेलेला विद्यार्थ्यी?  


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. ३१ जुलै २०२१पर्यंत सर्व रिक्त पदे भरण्यात येतील, असं आश्वासन दिलं आहे. हे आश्वासन अगोदर का दिले नाही? एक जीव तरी वाचला असता.पण स्वप्निलने केलेल्या आत्महत्येने इतर विद्यार्थांना नोक-या मिळतील.कोणाचा तर जीव गेल्याशिवाय शासनाला जाण का येत नाही? कोणाचा तरी बळी पाहिजे असतो का? अशा प्रकारच्या घटना नियमित घडत असतात. अपघात झाल्यानंतर शहरातले रस्त्ये नवीन होतात.


न्यायालयाने एमपीएससी परीक्षा झाल्यानंतर त्याला ठराविक  दिवसात / महिन्यात  नोकरी मिळाली पाहिजे. असा कालावधी ठरवून दिला पाहिजे. या परिक्षेच्या जाहीतीतच हा कालावधी नमूद करण्यात यावा. जर प्रशासनाला हा कालावधी वाढवायचा असल्यास त्याला न्यायालयाची परवानगी घेतली पाहिजे.


निवड झालेल्या उमेदवारांचे भवितव्य अधांतरी ठेवू नका.


Wednesday, June 16, 2021

शाळा भरल्याच नाही.


यावर्षीही करोनामुळे शाळा भरल्याच नाही. यंदाही शाळेची घंटा वाजलीच नाही.कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी राज्यातील शाळा ऑनलाईन माध्यमातूनच सुरू झाल्या आहेत. तिस-या लाटेमुळे राज्यातील शाळा सुरु करण्याची धाई करु नये.


उन्‍हाळी सुटी संपली की शाळेचे वेध लागायचे. शाळेसाठी विद्यार्थ्यांची तयारी झालेली असायची. नवे दप्तर, गणवेश, पुस्तक व वह्या, डबा व रेनकोट काय मजा असायची. नवा वर्ग व नवे मित्र मैत्रीणी भेट व्हायची. नवे शिक्षक व त्यांची भिती असायची. पहिला दिवस तर खासच असायचा.पहिल्यांदा शाळेत जाणा-या लहान मुलांचे रडणे व बालगोपाळांचा किलबिलाट मजेशीर असायचा.यावर्षी लहान मुलांच्या शाळेची लगबग दिसली नाही. 


"अरे उठ लवकर शाळेला उशीर होतोय्‌’’ इथपासून ते शाळेतील प्रार्थनेने सुरुवात व्हायची ती आपल्या शालेय दिवसांची! त्यानंतर वेगवेगळे तास आणि वेगवेगळे शिक्षक त्यात काही आवडीचे, तर काही नावडीचे. लहानपणी ते शाळेचे सहा तास कधी संपतात, असं वाटायचं आणि त्यात असणारी ती मधली सुट्टी तिची वाट पाहण्याची मजाच काही और होती. शाळेत जितके विषय तितकेच शिक्षक, त्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या शिक्षकांची शिकवण्याची पद्धती आणि स्वभाव यामुळे नकळतच काही विषय आवडीचे झाले, तर काही नावडीचे.. पण, प्रत्येक विषयाच्या तासाची मजा ही वेगवेगळी होती. शाळेत दंगामस्ती करायची व शिक्षाही भोगायची असा दिनक्रम असायचा.शाळेतील दिवस व मजा हवीहवीशी वाटायची.आपल्या जिगरी मित्रासोबत आवडीचा बेंच पकडण्याची लढाई लढायला ही फार मजा यायची.शाळेच्या पहिल्या दिवशी जाण्याची उत्सुकता फार जास्त असायची.  



परीक्षा न होताच यंदा उन्‍हाळी सुट्टी लागली. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर या वर्षीही शाळा ऑनलाईन सुरु झाल्याने बच्चे कंपनी बरीच नाराज झाली आहेत. लॅपटॉपच्या सोबतीने सुरु झालेली शाळा, विद्यार्थ्यी नाकारत आहेत.हजारोंचा स्मार्ट फोन किंवा लॅपटॉपच्या समोर बसून शाळा शिकायचे दिवस आले आहेत.शाळा म्हटलं की, युनिफॉर्म घालून, बसची वाट पाहत, किंचित कंटाळलेल्या चेहऱ्यांनी जाणारी लहान मुलं दिसायची. तीच मुलं आता लॅपटॉप, आयपॅड किंवा स्मार्टफोनसमोर बसलेली दिसतात. शालेय शिक्षणाबरोबर लहान मुलांना मोबाईल, टॅब व लॅपटॉप चांगल्या प्रकारे हाताळायाला येऊ लागले आहेत. शाळेतल्या शिक्षणातील मजा डिजिटल शिक्षणपद्धतीत नाही. ही एक तात्पुरती सोय आहे. लॉकडाऊनच्या काळात डिजिटल शाळेची एक नवी पद्धत समाजाने अंगीकारली खरी. पण ती प्रत्यक्ष शाळेला पर्याय ठरेल का या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच ठरवेल. हे संकट दूर होऊ शाळा लवकरच सुरु होतील अशी आशा करूया. 


प्रत्येकाच्या जीवनात शाळा खूप महत्वाची असते.


Monday, June 14, 2021

नर्सचे समर्पण

 नर्सचे समर्पण 


गेल्या वर्षापासून डॉक्टर व नर्स रात्रंदिवस अथक रुग्णांची सेवा करत करोनाच्या ससंर्गाशी लढत आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांवर प्रचंड कामाचा ताण आहे.रुग्णांच्या आरोग्य सेवेसह चाचण्या घेणे व लस देणे ही कामेही सुरु आहेत. आपले कर्तव्य बजावताना कित्येक डॉक्टर व नर्सेचा मृत्यु झाला आहे.सीमेवरील सैनिकाप्रमाणे कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कार्यरत आहेत. 






छत्तीसगडच्या काबीरधाम जिल्ह्यातील लिमोमधून एक घटना समोर आली आहे.  एक नर्स आपल्या आयुष्याची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णांची सेवा करत होती. ९ महिन्यांची गर्भवती असूनही, ती कोविड वॉर्डमध्ये ड्यूटी करत होती. परंतु याच काळात तिला करोनाचा संसर्ग झाला. एका मुलीला जन्म दिल्यानंतर तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला.खूप वाईट झाले. 


या नर्सने तिचा नवरा सांगत असताना देखील सुट्टी का घेतली नाही? ९ महिन्यांच्या गर्भवती असूनही कोविड वॉर्डमध्ये का ड्यूटी करत होती? गर्भवती  असल्याने दोन जीवाना धोका होता ते तिला कळले नसेल का? तिने हा धोका का पत्करला असेल? करोनापासून रुग्णांना वाचवत होती पण स्व:तला वाचवू शकली नाही. तिच्या मुलीला आता आई दिसणार नव्हती.त्या मुलीला आईची माया मिळणार नव्हती. नवजात बालकाची आई त्याला कायमची सोडून गेल्याचे मोठे दु:ख आहे. 


कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती, या लाटेत अनेकांनी आपले आप्त तर गमावलेच, पण काही मातांना त्यांची जन्माला न आलेली बाळंही गमवावी लागली. गरोदरपणाच्या काळात आई जर कोरोना पॉझिटीव्ह निघाली तर आरोग्यविषयक अनेक समस्या उभ्या राहू शकतात.  कोव्हिडच्या काळात नऊ महिन्यांचा काळ काढणं त्या महिलेसाठी, तिच्या घरच्यांच्यासाठी आणि तिच्या डॉक्टरांसाठी सगळ्यांसाठी सत्वपरिक्षेचा काळ आहे.


गर्भवती असताना देखील आयुष्याची पर्वा न करता परिचारिका रुग्णांसाठी काम करीत आहेत याचे कौतुक आहे.त्या जसं पोटातल्या बाळाशी कनेक्ट होतात,तसंच रुग्णांशीही कनेक्ट झालेल्या असतात. गर्भवती असताना पीपीई किटमध्ये राहून करोना रुग्णांची सेवा करणे किती कठीण आहे.आरोग्य विभागाने गर्भवती असलेल्या परिचारिकांना रुग्ण सेवा देणे बंद केले पाहिजे. 


चहाची तलफ

 


चहाची तलफ


" चहाला वेळ नसते .... पण वेळेला चहाच लागतो "  


पाणी, चहा पावडर, साखर व थोडेसे दुध यांना उकळल्यानंतर बनतो ’चहा’  


चहाची वेळ नसते हो.... चहाची तलफ असते..... मग येताय ना तुमची चहाची तलफ भागवायला.


वाफाळत्या गरमागरम अशा चहाचे तुम्ही दिवाने असालच!  दिवसाची सुरवातच एका मस्त चहाने होत असेल. दिवसभरातही अध्येमध्ये चहाचा आस्वाद घेऊन तुम्ही तुमचा कंटाळा आणि मूड ठिक करत असाल. सकाळी सकाळी गरमागरम चहा कपात घेऊन फुरकी मारत वर्तमानपत्र चाळणे म्हणजे स्वर्गानंद घेण्यासारखे आहे.  बाहेर मस्त मुसळधार कोसळणारा पाऊस, जोडीला धुक्याची अलवार पखरण अशा वातावरणात हमखास आठवणारं पेय म्हणजे ग्लासातला चहा. 


आज चहा भारतीयांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन बसला आहे.चहा म्हणजे काही लोकांसाठी अमृतासारखं असतं. चहाविना जगणे अशक्य होईल अनेक लोकांना इतकी सवय असते.आपण चहा आपल्या ताणतणावाला कमी करण्यासाठी पीत असतो. बरेच लोक थंडीच्या काळात आपली थंडी पळवण्यासाठी चहाचा वापर करत असतात. दिवसाच्या कुठल्याही वेळी आणि कुठेही अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या चहाचे हमखास ठिकाण म्हणजे गल्लीतील टपरी.घरी आलेल्या पाहुण्यांना चहापान देऊन संतुष्ट केल्यावर पुढची बोलणी वा सोपस्कार पटकन पार पडतात. चहाचा अतिरेक आरोग्याला हानीकारकही आहे.




चहा म्हणजे दोन मनांना एकत्र आणणारा दुवा होतो कधी कधी.समोरच्यासोबत चहा पिता पिता आपण खूप साऱ्या गप्पा मारतो. एखादा जुना मित्र किंवा मैत्रीण खूप दिवसांनी भेटली कि " चल , कुठेतरी बसून मस्त चहा पिऊ आणि गप्पा मारू. " हे वाक्य अगदी ठरलेले असते. चहा फक्त बहाणा असतो , तो  वेळ असतो जो आपल्याला समोरच्यासोबत घालवायचा असतो. 



लहानथोर, गरीब व श्रीमंत अशा सगळ्यांनी आपलंसं केलेला, माणसं जोडणारा, भूक भागवणारा, कधी भूक मारणाराही, नेहमीच्या टपरीवाल्याकडे कटिंग बनून येणारा आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नजाकतीने ’कस्टमर’ समोर ‘प्रेझेंट’ होणारा... हे समस्त गुणविशेष मिरवणारा चहा हे जगात पाण्याच्या खालोखाल प्यालं जाणारं पेय आहे.



अनेक ठिकाणी खेडेगावांमध्ये गुळाचा चहा करतात, तो खमंग लागतो.तो पेल्यातून दिला जातो.  ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या बागेत तुम्हाला गवती चहा ही औषधी वनस्पती सापडेल.गवती चहा  औषधी समजला जातो. गवती चहाला एकप्रकारचा सुंगध असतो, ज्यामुळे गवती चहा पिण्याने तुम्हाला लगेच फ्रेशदेखील वाटतं. मागे रेल्वेच्या प्रवासात कुल्लड्मध्ये चहा दिला जात होता.त्या चहाला भाजलेल्या मातीचा स्वाद येत होता. 


चुलीवरचा धुरकटलेला चहा, कमी दुधाचा किंवा बिगरदुधाचा काळा चहा, गुळाचा किंवा कमी साखरेचा कमी गोड चहा! साखरेचा चहा अभावानेच मिळे. बहुदा गुळाचाच चहा घ्यावा लागे, पण त्या चहात प्रेमाचा, मायेचा, आपुलकीचा, जिव्हाळ्याचा गोडवा भरपूर असे. सुटाबुटातील पाहुण्याने आपल्या घरचा घोटभर चहा घेतला तरी गावाकडील माणसे कृतकृत्य होत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.


आधुनिक काळात ग्रीन टी, लेमन टी असे चहाचे कितीतरी प्रकार आढळतात. गरम पाणी वा दुधात चहापत्तीचे छोटे पॅकेट बुडवून (डीप करून) झटपट चहा बनवला जातो. चहा-कॉफीची यंत्रेही आली आहेत. मात्र पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या चहाची चवच न्यारी!


दैनदिन जीवनात चहाचं महत्व, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जगभर २१ मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जात आहे.


तर चला मग चहाचा अस्वाद घेत आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करुया ,येताय ना !

Tuesday, May 18, 2021

निखळ तिचे हास्य

 

    


मुलीचं सहजसुंदर निखळ हास्य मी पाहताच तीचे फोटो काढत राहिलो. निखळ व निरागस हास्य किती गोड दिसतं याचा मला त्यावेळी प्रत्यय आला. तिचे मोहक, लोभस हास्य. जशी हवेची मंद झुळूकच. सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक सुंदर, निरागस व मनमोहक मुलगी आंनदात झोपाळ्यावर बसून  हळुवार झोके घेत  होती. चेह-यावर हलकसं स्मित उमटल्याने सुंदरता अधिक वाढली होती.चेहर्‍यावरील हास्य ही निसर्गाने मानवाला दिलेली एक अनमोल व सुंदर देणगी आहे,याचा प्रत्यय आला. लहान मुलांना झोका घ्यायला खूप आवडते. तेथे आजुबाजुला दुसरी कोणी दुसरी मुलं नसल्याने ती शांतपणे झोका घेत स्व:तात रमली होती. बाकीच्या जगाचा जणू तिला  विसर पडला होता. झोका घेताना ती स्वत: आंनदात दिसत होती. ती तिच्या खुशीत रमली होती. थंडगार हवेची झुळूक अंगावर घेत झोका घेण्यात सुखावली होती. तेव्हा तेथील वातावरण देखील प्रसन्न वाटले होते. बोलक्या डोळ्यांनी मोकळ्या मनाचे हितगुज साधत होती. जणुकाय स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी. तिच्यात अवखळपणा दिसत नव्हता. प्रत्येक झोक्यासह तीचे हास्य फुलत होतं. तिचे गोड स्मित बघत राहावेसे वाटत होतं. तिचे ते  बोलके हास्य व चेह-यावरती कोमलता पाहून ती फुलांसारखी नित्य उमलावी व स्वच्छंदी बागेत बागडावी असे  वाटलं. तीचे ते बालपणीचे सुंदर क्षण डोळ्यात साठवूनी  ठेवावेत असे झालं होतं. तिला त्यावेळी पाहून कवीला नक्कीच कविता सुचली असती. 


निखळ,निर्मळ हास्य हे मानवाला मिळालेलं वरदान आहे. हास्य हा मनाचा आरसा आहे. चेहऱ्यावर निखळ हास्य हीच तर आहे खऱ्या  माणसाची ओळख असते.हसणारे चेहरे स्वत:सह इतरांचे चेहरेदेखील हसरे करून जातात, मने हलकी करून जातात.एका हास्याने समोरच्याचे हृदय जिंकता येते, मनातील मळभ दूर करता येते, मैत्रीचा हात पुढे करता येतो, शत्रूशी वैर संपविता येते, मनावरील ताण हलका करता येतो, अनेक मानसिक आजारांना दूर पळवून लावता येते अशी हास्याची महिमा सांगणारे गुण सर्वपरिचित आहेत. कदाचित म्हणूनच सर्वांनी हसलं पाहिजे.हसल्याने आयुष्य वाढत असल्याने कायम हसत रहा.  


Monday, March 22, 2021

‘जनता कर्फ्यू’

     ‘जनता कर्फ्यू’



वाऱ्याच्या वेगानं पसरत चाललेल्या करोनाला रोखण्यासाठी जनता कर्फ्यूची हाक देण्यात आली, त्या दिवसाला आज वर्ष पूर्ण झालंय. २२ मार्च २०२०! कसं गेलं एक वर्ष ? करोनापासून केव्हा मुक्ती या प्रतिक्षेत की प्रादुवार्भाच्या भीतीत? एक वर्षानंतरही करोनाची भिती दूर झालेली नाही. करोनाविरुध्दची लढाई सुरुच आहे.


पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूच्याच दिवशी ५ वाजून ५ मिनिटांनी लोकांना टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं होतं.या वर्षपूर्तीनिमित्ताने जनता कर्फ्यूला उजाळा दिला जात आहे.पंतप्रधानांच्या एका आवाहनावर देश थांबला होता.करोनाची धास्ती नवीन असल्याने नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने या आवाहनाला प्रतिसाद दिला होता.त्यावेळी वाटले नव्हते करोनाविरोधात मोठी लढाई लढावी लागणार आहे.   


गेल्या वर्षी २२ मार्चला देशात ३३० रुग्ण बाधीत होते. आता देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १६ लाख इतकी झाली आहे.तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५९ हजार इतकी आहे. सध्या देशात ३ लाख ३४ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात करोनाने हाहाकार माजवला आहे.किती दिवस घरात राहून जीवन जगणार? लोकांनी करोनाबद्द्ल सरकारने दिलेले सर्व नियमांचे पालन करीत जीवन जगण्यास सुरुवात केली आहे.काही भागात व लोकांमध्ये गांभीर्य दिसत नाही.


विषाणू प्रतिबंधक लस निर्माण करण्यात यश आले.देशात लसीकरण वेगाने सुरु आहे. या लसीकरणावरच करोनाचे नियत्रंण अवलंबून आहे. लसीकरण करण्यात आलेल्यांची संख्या ४ कोटी ५० लाख झाली आहे.लसीकरण सुरु असल्याने करोनावर आपण नक्की मात करु असा दावाही काही तज्ज्ञांकडून आत्मविश्वासाने केला जातोय. मात्र लसीकरणानंतरही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.पुढील काही वर्षांसाठी आपल्या सर्वांनाच सोशल डिस्टन्सिंग आणि तोंडावर मास्क घालून फिरावं लागेल, असंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.    


आता देशात जनता करोनाच्या दुस-या लाटेला सामोरे जात आहे. पहिली लाट मागच्या वर्षात स्थिरावली होती.देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा होण्याची शक्यता आहे.


परिस्थिती बदलण्याची वाट पाहावी लागणार आहे.

Friday, March 5, 2021

’अतुल’ तु जाऊ नकोस.

मित्राचा सकाळीच फोन आला. आज सकाळी आपला मित्र ’अतुल’चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मी ’काय’ असे मोठ्याने ओरडलो. क्षणभर काहीच कळले नाही. अत्यंत धक्कादायक बातमीने काहीच सुचत नव्हते. फोन सारखा वाजू लागला. बातमी खरी आहेत का? अशी विचारणा होत होती. कोणाला विश्वास बसत नव्हता. 


अतुल हा माझा मित्र. मी वडाळ्याला कॉलनीत राहायला होतो तेव्हापासूनची आमची ओळख. मस्त देखणा व रुबाबदार व्यक्तिमत्व. अतुल, मुंबई पोर्ट ट्रस्टला माझ्या नंतर नोकरीला लागल्यावर आमची मैत्री आणखी वाढत गेली.त्यानंतर त्याचा लहान भाऊ ’अभय’शी ओळख झाली. दोघेही उंच व भारदस्त शरीरयष्‍टीचे मोटर सायकलने कामावर यायचे. या दोघांची आई देखील मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये काम करीत होत्या. त्यामुळे या दोघांची सर्वांशी लवकर ओळख झाली. कामात दोघेही हुशार होते. आई सेवानिवृत झाल्यावर कॉलनीतून अभय दादरला व अतुल ठाण्याला राहायला गेला. अतुल ठाण्याला आल्यानंतर रेल्वेत नेहमी भेट होत गेली. अतुल बरोबर काही सहली झाल्या.  


लहान भाऊ अभयचे आजारात निधन झाल्यावर त्यांच्या कुंटुंबावर मोठे संकट कोसळले.अभय नंतर अतुल व त्यांचा लहान भाऊ अनिकेत यांनी कुटुंबाला सावरले. काही दिवसाने आई आजारी झाली.अतुलने आईला ठाण्याला आणले होते.अतुल ऑफिसला गेल्यावर अतुलची पत्नी व आई दोघी घरी असायच्या.   


अतुल च्या निधनाची बातमी ऑफिसमध्ये गेल्यावर जवळच्या मित्रांनी ठाण्याच्या दिशेने धाव घेतली.सर्वांना दु:ख झाले होते.अंतिम दर्शनासाठी नातेवाईक जमत होते. घरी जाऊन त्याच्या भावाला व अतुलच्या पत्नीला भेटलो.त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. सांत्वन करणे शक्य नव्हते. सर्व कुंटुंबीय कालच रात्रीच सहलीहून परतले होते. सहलीत मजा करून घरी परतले होते आणि लगेच दु:खात गेले.   


सर्व नातेवाईक जमल्यावर अंतिम तयारीला वयस्कर मंडळी लागली. अतुल पार्थिव देहाला खाली आणण्यात आले.विधी झाल्यावर सगळ्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी अतुलची आई गॅलरीतून सर्व पाहत होती. प्रेतयात्रा सुरु झाली. त्यावेळी ती ’अतुल तु जाऊ नकोस’ अशी म्हणत होती. काय वाटले असेल त्यावेळी त्या माऊलीला? माझा अतुल मला आता परत दिसणार नव्हता. माझी दोन्ही मुलं मला सोडून गेली, हे दु:ख तिला सहन करणे कठीण होतं.   

Wednesday, January 20, 2021

विश्वचषक जिंकल्याचा आंनद

 






अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात इतिहास घडवल्याने क्रिकेटप्रेमींना मोठा आंनद झाला. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवून मालिका जिंकणे हा पराक्रम विश्वचषक जिंकल्याचा आंनद देतो. नवोदितांनी प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मिळवलेला हा विजय ऐतिहासिक आहे. ऑस्ट्रेलियाच्या मजबूत संघाला नवख्या खेळाडूंनी दिलेल्या लढ्याने विजय संपादन केले हे विशेष आहे. भारतीय संघाने नवोदित खेळाडू आणि दुखापतींचे आव्हान पेलत हा मालिका विजयाचा अध्याय लिहिला.

एकामागून एक येणाऱ्या आव्हानांना समर्थपणे सामोरं जात त्यांनी ही मालिका जिंकून दाखवली आहे.भारतीय संघाने या मालिकेत संपूर्ण ताकदीनं उतरलेल्या मुरब्बी यजमानांना धूळ चारल्याने हा विजय अविस्मरणीय ठरला.  


ऑस्ट्रेलियाने कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल की त्यांचा असा पराभव करीत चांगली जिरवली आहे.ऑस्ट्रेलियाच्या जेष्ठ खेळांडूची भाकित चुकीची ठरली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाची लाज काढली होती.भारताच्या युवा संघानं त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण केल्याने भारतीय संघाचे कौतुक होत आहे.


भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक केल्याने ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला आहे.ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंसह संपूर्ण मालिका खेळूनदेखील ऑस्ट्रेलियाला पराभव पत्कारावा लागल्यानं खेळांडूना धक्का बसला आहे. कसोटीतील सर्व निर्णायक क्षणाला भारतीय खेळाडूंनी आपला खेळ उंचावला, जे ऑस्ट्रेलियाला जमलं नाही. दोन्ही संघात फक्त हाच फरक होता.भारतीय संघाने कधी ३२८ धावा केशा केल्या ? हा प्रश्न सतावत आहे. 


तशी ही मालिका गाजली. ३६ धावात भारतीय संघ गारद झाल्याने पराभव, भारतीय संघाचे ९ खेळाडू दुखापतग्रस्त, बदली कर्णधाराचे   कुशल व कल्पक नेतृत्व, पुजाराची झुंजार वृत्ती, नवोदीत गोलंदाजांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं, चौथ्या कसोटी सामन्यात संघाचा सांघिक व सकारात्मक खेळ व अनेक विक्रम नोंदवले गेले, नॅथन लायनला भारतीय संघातील खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली संघाची जर्सी खास भेट.


ऑस्ट्रेलियाच्या तीन वेगवान गोलंदाजांनी सातत्याने पुजाराच्या शरीराच्या जवळपास मारा केला.स्वत:ची विकेट वाचवताना एक चेंडू पुजाराच्या खांद्याजवळ येऊन आदळला. एक चेंडू तर अतिशय जोरदार उसळी घेऊन थेट त्याच्या हेल्मेटवर आदळला. पण अनेकविध फटके अंगावर झेलून पुजाराने अतिशय शांतपणे फलंदाजी सुरू ठेवली. एखाद्या भिंतीप्रमाणे अभेद्य असा तो यजमान संघापुढे उभा राहिला. त्याच्या याच गुणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. 


पहिल्या कसोटीतील दारूण पराभवानंतर लढाऊ वृत्ती दाखवत भारताने केलेल्या या पुनरागमनाचे कौतुक अनेक दिग्गजांनी केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर इत्यादींनी ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाला ५ कोटी रुपयांचा बोनस देखील जाहीर करण्यात आला आहे.


 

विजयासाठी आवश्यक ३२८ धावांचे लक्ष्य अत्यंत सुनियोजित पद्धतीने गाठून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या क्रिकेट कसोटीमध्ये पाचव्या दिवशी तीन गडी राखून थरारक व अभूतपूर्व नोंदवलेला विजय अविस्मरणीय ठरला आहे .भारतीय युवा संघाने सामना  वाचवायचा नाही तर तो जिंकून मालिकेचा शेवट धडाकेबाज करायचा बेत आखाला आणि सिध्द करुन दाखवले आहे​. याकरीता ’सलाम’ या युवा संघाला.


Friday, January 8, 2021

लसीकरण मोहीम

 

लस कधी येणार याची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. ती लस उपलब्ध होत आहे. सामान्यांना केव्हा मिळणार? लस आली पण अनेक प्रश्न घेऊन आली. लस घ्यायची की नाही यावर चर्चा सुरु आहे. शरीरावर लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात. लसीकरण ऐच्छिक केले आहे. मोफत देणार का? असे प्रश्न समोर येत आहेत.खोट्या बातम्या आणि गैरसमज यांचे पेव संपूर्ण जगभर फुटलेले आहे याचा परिणाम लस आणि लसीकरणाबाबत झालेला दिसून येत आहे.

लसीबाबत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. लसीबाबतची उदासिनता हे जगातील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आव्हान आहे. कोविड१९ सारख्या वैश्विक महामारीचा एका देशातून दुसर्‍या देशात संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने संपूर्ण जगातील नागरिकांनी ही लस टोचून घेणे परिणामकारक आहे. यासाठी प्रत्येक देशाने प्रभावी नियोजन करून भविष्यात उद्भवणार्‍या आव्हानांना सामोरे जाणे गरजेचे आहे.   


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ’कोविन’ नावाच्या कुठल्याही अ‍ॅपला बळी पडू नका, असा सावधानतेचा इशारा दिला आहे.लस नोंदणीसाठी अद्याप कोणतेही अ‍ॅप सुरू करण्यात आलेले नाही. ’कोविन’ या अॅपवर आपली कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नका, असा सावध राहण्याचा इशाराही दिला आहे.लसीकरणासाठी प्रत्येकाला सरकारकडे आपली नोंदणी करावी लागणार आहे.फक्त  नोंदणी केलेल्या लोकांनाच लसीकरण केंद्रावर लस दिली जाईल.मुंबईतील कोव्हिड सेंटरचे जम्बो लसीकरण केंद्रात रुपांतर करणार आहेत.जम्बो कोव्हिड सेंटर्समध्ये फारसे रुग्ण नाहीत. त्यामुळे त्या सेंटरचा वापर लसीकरण केंद्रांसाठी केला जात आहेत.केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना लस देण्याची योजना आखली आहे.


गेले काही दिवस लसीच्या चाचण्या व मंजुरी मध्ये गेले. प्रत्येक देश लस निर्मिती करण्यास लागला. आपली लस किती प्रभावी व दुस-या लसीचे दुष्परिणाम दाखवले जाऊ लागले. लसीला जगात मोठा बाजार असल्याने लस निर्मिती जोरात सुरु आहे. ब्रिटन आणि अमेरिकेतील नागरिकांना कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर जगातील इतर देश या लशीची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


लसीकरण मोहीम कशी राबवायची यासाठीचे नियोजन करण्यात आलेले आहे. आरोग्य कर्मचारी,राज्य आणि केंद्रीय पोलीस, महानगरपालिका कर्मचारी, ५० वर्षावरचे लोक व ५० वर्षाखालील आजारी  अशी क्रमवारी लावली आहे. वाहतुक, शितगृहे व प्रशिक्षणाची तयारी सुरु आहे. ड्राय रन घेण्यात आले. नागरिकांना लसीकरणादरम्यान कुठल्याही अडचणी येऊ नये आणि लसीकरण प्रक्रिया सहजरित्या पूर्ण व्हावी, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. लस घेतल्यानंतर होणा-या दुष्परिणामावर उपाय करणार आहेत.


लशींना मान्यता मिळाल्यापासूनच्या दहा दिवसांत म्हणजे पुढच्या आठवडय़ापर्यंत लसीकरण मोहिमेस सुरुवात होणार आहे.देशात करोनाच्या दैनंदिन रुग्णवाढीत आणि मृतांच्या संख्येत घट होत आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटत आहे. तेव्हा प्रादुर्भाव असे पर्यत लसीकरण सुरु व्हावे. नाहीतर लस कोणी घेणार नाही. 


२०२१ मध्ये ही वैश्विक महामारी थांबवणे हे संपूर्ण जगासमोरील मोठे आव्हान असणार आहे. लस टोचून घेतलेल्या माणसाला जसा लसीचा फायदा होतो, त्याचप्रमाणे लसीमुळे रोगप्रसार मंदावल्याने, ती न घेतलेल्यांनासुद्धा लसीचे अप्रत्यक्ष फायदे मिळतात. याच कारणास्तव कोरोनासारख्या रोगावरील लस ही मानवतेच्या हिताची आहे.सामूहिक रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी किती प्रमाणात लसीकरण व्हायला हवे.


एक बरं झालं ही लस नव्या करोना स्ट्रेनवर देखील प्रभावी ठरणार आहे. नाहीतर नव्या लसीची निर्मिती करावी लागली असती.


रोगाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण करणे, आत्यंतिक गरजेचे आहे.